Tuesday, October 4, 2016

ये लाल रंग कब मुझे छोडेगा.....

मी तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मी काही दिवसांची आणि ती खूप साऱ्या वर्षांची होती. तिचं नाव काढल्याबरोबर आमच्या घरात सारे जण जरा सावरूनच बसायचे. तिचा दबाबा म्हणा, आदर म्हणा किंवा भीती म्हणा पण आजोबांपासून ते माझ्यापर्यंत सारेच काहीही बोलताना, वागताना दोन सेकंद विचार करायचे आणि मगच वागायचे. तिच्यामुळे घर सांधल गेलं होतं. तिच्यात आणि माझ्यात तब्बल दोन पिढ्यांचं अंतर होतं. ती गेली तेव्हा मी काही वर्षांची होते, पण तरीही तिची ती लाल साडीतली पिटुकली मूर्ती डोळ्यातून काही हलत नाही.

तिचं लग्न झालं तेव्हा ती १०,१२ वर्षाची होती, त्या काळात त्याच वयात तर व्हायची तर लग्न. तिचं नशीब चांगलं म्हणून तिला वैद्यकीय शिक्षण घेणारा नवरा मिळाला होता. एका छोट्याशा गावात ती आपलं काचापाणी खेळण्यात, शेगडीवर स्वैपाक शिकण्यात, सोवळ ओवळ शिकत असताना साथीच्या तापाचं निमित्त झालं आणि तिच्या कुंकवाचा धनी अचानक गेला. लग्नात फक्त त्याला बघितलं होतं, आणि न्हाण झाल्यावर एक दोन वर्ष सासरी काढली तेवढाच काय संसाराशी तिचा संबंध आलेला. पहिल्यांदा तिचं केशवपन केलं तेव्हा ती १६ वर्षांचीच होती. आज आत्ता हे लिहिताना देखील माझे हात थरथराताहेत आणि तिनी तर आयुष्यभरासाठी लाल साडी जवळ केली होती.

ती खरं तर माझ्या आजोबांची आत्या, पण तिला भविष्यात कोण बघणार म्हणून मग आजोबा तिला दत्तक गेले आणि तिचा भविष्यकाळ सुरक्षित झाला. समाजात स्थान मिळवण्यासाठी ते टिकवून ठेवण्यासाठी आता तिला आधार होता तिच्या सोवळेपणाचाच. शक्य तेवढे उपवास, देवाचं भजन कीर्तन, कमीत कमी जेवण, तीर्थटन( ते ही स्वतःच्याच शिध्यासह , किंवा देवळांमध्ये जेवायच्या सोयीवर ), केशवपन आणि लाल आलवण तर जगण्याचाच एक भाग होता तिच्या. काळ बदलला तरी तिनी बदलणं शक्य नव्हत कारण तिच्या आयुष्यात काही बदल घडणं शक्यच नव्हतं, तो पर्याय जणू तिच्यावरच्या संस्कारांनी कधीच संपवला होता.

निर्जळी एकादशी करणं चातुर्मासाचे नेम पाळणं, नवनवीन भजनं गाणी म्हणणं हाच त्यांच्या आयुष्याचा परिक्रम होता. साधं सात्विक खाताना, आपली साधनशुचिता आजूबाजूच्या साऱ्यांवर लादणं ह्यात त्यांना कधीच काही गैर वाटलं नाही. मला मिळालं नाही म्हणून दुसऱ्यांना मिळू नये असा भाव नव्हता त्यात तर हे असंच जगायचं असतं अशी त्यांची ठाम धारणा होती. या मानलेल्या मुलाचा संसार त्यांनी त्यांचा मानला होता. त्यामुळे त्या संसारासाठी शक्य होईल तेवढी मदतही त्यांनी केली होती, त्यामुळे आश्रिताचं जीवन त्यांच्या नशिबी आलं नव्हतं. त्यांच्या त्या कष्टाची जाण घरातल्या मुलांनीच नव्हे तर घरात येणाऱ्या सुनांनीदेखील ठेवली होती. कुरबुरी थोड्या अनिच्छेनेच पण घरात पणजी असेपर्यंत तिचे सोवळेओवळे, तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी घरात पाळल्या जात होत्या. त्या बरोबर होत्या कि नव्हत्या या पेक्षाही त्या सवयी, प्रथा पाळल्या तर पणजीला आनंद होतो म्हणून पाळल्या जायच्या. तेवढा मान तिनी तिच्या त्या लाल अलावण मधून कमावला होता.

आज सांगून खऱ्या वाटणार नाही अशा लाल साडीतल्या बायकांच्याबद्दल मी नंतर कन्नड साहित्यिक अनंतमूर्थी, भैरप्पा यांच्या पुस्तकांमधून वाचलं. तेव्हापासून तो लाल रंग डोक्यातून जाताच नाही. आजही जेव्हा जेव्हा पणजी आजीची जपून ठेवलेली लाल साडी हातात धरते तेव्हा तिचे न सांडलेले अश्रू मला हाताला लागतात. न जगलेल्या आयुष्याचे खरखरीत स्पर्श अंगावर काटा उभा करतात, अपूर्ण इच्छा आकांक्षाचे कढ हाताला लागतात, मारलेल्या मनाचे ओरखडे कुठे कुठे बोचतात. समाजाने भाग पाडायला लावलेल्या या सक्तीच्या आयुष्याची बोचही कुठे कधी जाणवते. पण तरी या सगळ्याला पुरून उरलेलं समाधान मायेच्या उबेनी बाकी सारं झाकून टाकत!


मला लाल रंग कधी मनापासून भावला नाही कारण माझ्या आजूबाजूचा हा लाल रंग मला कायम आठवण करून देतो अशा आयुष्यांची. खरं तर लाल रंग हा उत्तर भारतात अतिशय शुभ मानतात, नव्या जीवनाची सुरुवात समजला जातो. पण याच लाल रंगात आयुष्य संपवणाऱ्या अनेक विधवा, सधवांसाठी आजचा लाल रंग.....!!!!!!!!!!!!   

Monday, October 3, 2016

शांत निवांत शुभ्रांत...

तिनी१८ व्या महिन्यात आईची मांडी सोडून दिली नुकत्याच जन्मलेल्या भावासाठी , ती होती तिची पहिली तडजोड, मग हातातले खेळणं, चॉकलेट, पेढा, गाडीवर पुढे उभं राहायचा हक्क, कोणत्याही खेळण्यात जिंकण्याचा आनंद, असे छोटे मोठे प्रसंग ती घडवत गेली, प्रत्येक वेळी तिच्या पदरी पडायचं मोठे पणाचं आणि तडजोडीचं मापटं. ताई तू मोठी आहेस ना, मग दे ना सोडून. अग त्याला नाही कळत म्हणून तू दे सोडून. जणू मोठं होणं म्हणजे तिच्यासाठी थोडे थोडे सगळं सोडून देणं शिकणं होतं. मग त्या सगळ्याची इतकी सवय झाली की तिला सोडून देणं म्हणजेच जगणं वाटायला लागलं.

मोठेपणाच्या रस्त्यात कधी तरी तो भेटला. शाळेत , कॉलेजात समोरच वाटेवरच असायचा. पण स्वतःहून काही मागायचं, पाहायचं माहीत नसल्यानं तिच्या लेखी त्याचं अस्तित्व शून्य होतं. तो मात्र सावलीसारखा फिरायचा, त्याची काही अपेक्षा नव्हती, तिला बघायला मिळालं की त्याला छान वाटायचं.  ते वयच असं होतं की कोणावर तरी जीव ओवाळून टाकावासा वाटायचा, प्रेम वगैरे म्हणण्यापेक्षाही नैसर्गिक तारुण्यासुलभ आकर्षण जास्त असावं. पण चारपाच वर्षाहून अधिक काळ ते टिकलं, प्रेमच असावं ते बहुदा. तिच्यापर्यंतच काय अख्ख्या गावाला कळल होतं. तर मग तिच्या वडिलांपासून ते कसं लपेल. तिनी कोणालाच नाही म्हणलं नव्हतं, आधी त्याच्या प्रेमाला, आणि नंतर चिडलेल्या वडिलांना.

प्रेमाला जितक्या सहज तिनी हो म्हणलं होतं तितक्याच सहजतेनं तिनी वडिलांचा विरोध सहज स्वीकारला. तडजोड, शरणागती म्हणजे सगळं संपण नसतं, कदाचित ती दुसऱ्या नवीन कशाची सुरुवात असते असं ती म्हणायची, त्यामुळे ती पांढऱ्या रंगाचा ध्वज घेऊन कायम उभीच असायची. शिक्षण संपवून वडिलांनी बघून दिलेल्या मुलाच्या गळ्यात हार घातला आणि त्यानी घातलेल्या मंगळसूत्राच बंधन आयुष्यभरासाठी बांधून घेतलं.

तिचा संसार अगदी सुखाचाच चालला होता, कारण तिची कोणत्याही बाबतीत कोणतीच तक्रार नव्हती. सगळ्यांचं म्हणणं ऐकताना आपलंही काही म्हणणं असू शकतं हे देखील ती विसरली होती, त्यामुळे सारं काही सुरळीत चाललं होतं. दोन मुलं सासू सासरे, नवरा येणारे जाणारे सारे काही ती पाहून घेत होती. घर सावरत होती, उभारत होती. सगळं कसं चाकोरीतल्या सारखं चाललं असताना अगदी एका क्षणात सारं काही बदललं, तिचा नवरा चालता बोलता गेला, मुलं आडनीड वयात होती. पण तिनी सगळं सावरून घेतलं. थकलेल्या सासू सासऱ्यांना मुलाची कमी भासू दिली नाही. त्यांनीही शांतपणे तिच्या मांडीवर जीव सोडला.

शिकून मुलं बाहेर पडली, आणि घरात उरली फक्त ती. आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगत असताना आता स्वतःसाठी कसं जगायचं हा प्रश्नच पडला होता. आता कोणाच्या साठी काहीतरी सोडायचं?, कोणाच्या हो मधे हो म्हणायचं? पावित्र्य तर तिनी आयुष्यभर जपलच होतं, आणि शरणाचा पांढरा झेंडा तर जणू तिच्या शरीराचाच एक भाग होता. पांढरा रंग जसा पावित्र्याचा, तसाच शांततेचा रंग असतो. पाश्चिमात्य समाजात हा रंग धार्मिक साधनशुचीतेचा रंग देखील समजला जातो. आपल्याकडे पांढऱ्या रंगाकडे अशुभाची सावली म्हणून ही बघितलं जातं. मुळात साऱ्या रंगांहून वेगळा असूनही स्वतंत्र ओळख मिरवणारा हा रंग. आजचा पांढरा रंग स्वतःसाठी न जगणाऱ्या, कायम शरणागतिच्या, तडजोडीच्या तयारीत असणाऱ्या ‘स्त्री’ जातीला..!!!!!!!!!!!!!!!!!


Sunday, October 2, 2016

केसरीया बालमा....

अगदी दाखवायच्या कार्यक्रमापासूनच तिला त्याच्यातला साधेपणा आवडला होता, ज्या काळात मुलाकडच्यांनी मुलीकडच्या लोकांना वेठीला धरण्याचा एक कलमी कार्यक्रम असायचा, हुंडा न घेणं म्हणजे कमीपणाचं समजलं जायचं, लग्न म्हणजे दुसऱ्यांच्या पैशावर मोठेपण मिरवणं असायचं. आजही त्यात फार काही फरक पडलेला नाही, पण आज त्या सगळ्याला हौसेचं गोंडस नाव दिलं जातं. तर साधारण ४०, ५० वर्षांपूर्वी त्यानं बघण्याच्या कार्यक्रमातच सांगितलं होतं आम्हाला साधं लग्न हवं आहे, पण जरा तुम्हाला साग्रसंगीत लग्न करायचं असेल तर निम्मा खर्च आम्ही करू. त्यानंतरही लग्नात त्यानी ना स्वतःचे पाय धुवू दिले ना त्याच्या आई चे. कन्यादान शब्दाऐवजी कन्याभेट हा शब्द वापरायला लावला. छोट्या छोट्या गोष्टीतला त्याचा साधेपणा तिला भावत होता.
त्याच्याशी लग्न झाल्यावर तिला आयुष्याचं खरं सार्थक वाटत होतं. तिला शिकायला त्यानीच प्रोत्साहन दिलं, आणि तो एकटाच अपवाद होता असं नाही त्याचं सारं घरदार असा जगाच्या  चार पावलं पुढचा विचार करणारं होतं. इतका मोकळा श्वास तिनी तिच्या घरात क्वचितच घेतला होता, स्त्री पुरुष समानता फक्त पुस्तकात नसते तर अशी प्रत्यक्ष आयुष्यात अनुभवता येते. स्त्री पुरुष समानता म्हणजे प्रत्येक गोष्टीत स्पर्धा करणं नसतं, किंवा पुरुष करतात त्या साऱ्या गोष्टी करणं नसतं, स्त्री पुरुष समानता म्हणजे स्त्री पुरुष दोघांनी एकमेकांचा स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मान करणं असतं, स्वतंत्र विचारांचा आदर करणं असतं. तील रोज नवीन काही तरी शिकायला जगायला मिळत होतं.  
लग्नाला ५ वर्ष होऊनही तिची कूस काही उजत नव्हती, तशी घरातल्या कोणाचीच काहीच तक्रार नव्हती. वाट बघूयात, काही झाडांना उशिरा फळ धरत, शेवटी मूल जन्मण हा ही निसर्ग धर्मच असतो ना. एकमेकांची समजूत काढणं सुरु असायचं. मग कधी तरी विज्ञानाचाही सल्ला घेऊ म्हणत तिनी जवळपास ओढतच त्याला डॉक्टरकडे नेलं. त्याचं म्हणणं होतं, मूल नाही म्हणून काय झालं? त्यासाठी काही प्रयत्न करावे असं त्याला मनापासून वाटत नव्हतं.तिच्या हट्टाखातर जेव्हा ते डॉक्टर कडे गेले.
आपण आपल्या नवऱ्याला मुल देऊ शकत नाही ह्याचा त्रास स्त्रीला जास्त होतो, समाजानी जाणीव करून देण्याच्या आधीच तिचंच मन तिला खात असतं. जेव्हा नवरा सख्ख मित्र झालेला असतो तेव्हा बायकोला मुल न होणं हा जणू तिचाच अपमान वाटतो. आपण कुठेतरी कमी पडलोय, ज्यावर त्याचा हक्क आहे ते आपण त्याला देऊ शकत नाही याचं दुःख जास्त असतं. मातृत्वाचा आनंद फक्त जन्मातून मिळत नसतो, पण वंशसातत्याची भ्रामक कल्पना मात्र मनावर इतकी घट्ट पकडून असते की बाईला आपण एखादा गुन्हा केलाय असच वाटत असतं. दुर्दैवाने तिच्यातच दोष होता ज्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नव्हती. त्यानी समजूत घातली तरी तिच्या मनातून डोक्यातुन ते जात नव्हतं. वैद्यकीय शास्त्रही आजच्या एवढ प्रगत नव्हत. तिला आयुष्यभर तिच्यामुळे नवऱ्याला कोणत्याही अप्रिय प्रसंगाला तोंड देऊ द्यायचं नव्हतं.

मग एक दिवस स्वतःच निर्णय घेऊन तिनी गावाकडून एक मुलगी आणली,पहिले तिची वैद्यकीय तपासणी करून घेतली, आणि नवऱ्याला बोहोल्यावर चढवलं. स्वतःच्या जीवाची शपथ घालून तिनी त्याच्याकडून जबरदस्ती हे लग्न करवून घेतलं. त्याला मुल नको होतं ती हवी होती, पण तिला त्याला जगातलं सारी सुखं द्यायची होती. सुरुवातीचे कितीतरी दिवस तो त्या नव्या बायकोशी एक शब्दही बोलला नव्हता, जवळ येणं  तर लांबच राहिलं. पण तिनी तिचा हेका सोडला नव्हता. शेवटी ती काही दिवसांसाठी म्हणून घराबाहेर पडली, आणि जोवर मला काही बातमी मिळत नाही तोवर मी या घरात पाउल ठेवणार नाही म्हणाली त्यानंतर २, ४ महिन्यांनी कधी तरी त्यांनी त्याचा पुरुष धर्म गाजवला, आणि फळ निष्पत्ती झाली. मग कुठे ती घरी आली. सवत तिनीच आणलेली होती, एका सध्या घरातली, खायचे प्यायचे वांदे होते, शिक्षण जेमतेम झालं होतं. परिस्थिती अशी होती, की या दुसरेपणावर सुद्धा ती खुश होती.

आपल्या जोडीदाराला त्याचा वंश पुढे नेण्यासाठी आपला काहीच उपयोग होऊ शकत नाही याचं दुःख  आई होऊ शकत नाही या दुःखापेक्षा जास्त होतं. पण जेव्हा त्याचं मूल जन्माला आलं तेव्हा तिलाच भरून पावल्या सारखं वाटलं. मग कधी तरी ती त्यांच्या घरातून बाहेर पडली ती कायमचीच, कारण ती त्या घरात असे पर्यंत दुसरीला बायकोची जागा मिळाली नसती. त्यागातून मिळणारा आनंद स्वतःला काही मिळण्याच्या आनंदापेक्षा जास्त असतो हे तिनी अनुभवलं होतं.

केशरी रंग हा कायम त्यागाचा, धार्मिक अनुष्ठानाचा रंग समजला जातो. मुळात प्रत्येक धर्म एकच गोष्ट सांगतो, जगा आणि जगू द्या. शक्य तेवढा आनंद समाजाला, लोकांना द्या. आणि त्याग म्हणजे तरी काय, आपल्याच लोकांसाठी काही तरी सोडणं, काहीतरी करणं. त्यामुळे या दोन्ही भावना दाखवणारा रंग एकच आहे यात काही विशेष नाहीच. आजचा हा केशरी रंग हा असाच सतत त्याग करणाऱ्या पण तरीही आनंदी असणाऱ्या, किंवा जगण्यातून धर्माचा परिपाठ ठेवणाऱ्या साऱ्याच आई काकू,मावशी आत्या, ताई, आजी सगळ्याच ‘तिच्या’साठी!!!!!!!!!!!!!!!   

Saturday, October 1, 2016

काळा + पांढरा

चार चौघींसारखीच होती ती, दिसायला ही, वागायला ही. सर्वसामान्य घरासारखं घर, बाबा कमावणारे, आई घरी सगळी कामं करणारी, एक भाऊ एक बहिण, येऊन जाऊन असणारे पाहुणे, समाज मान्य चौकटी मधे जे जे करतात,  मग २२ व्या वर्षी तिच्या बहिणीचं लग्न झालं, आणि २३ व्या वर्षी तिची बहिण आई झाली, भाऊ इंग्रजी माधाय्मात शिकत होता,आणि हिनी बी एड केलं होतं. शाळेत नोकरी सुरु झाली आणि घरी लग्नाची शोध मोहीम, सुरु झाली. ओळखीतून पाळखीतून स्थळ आलं होतं, मुलगा तिच्या पेक्षा  जास्त शिकलेला होता, कमावत होता, स्वतःचं घर होतं, बहिणीचं लग्न झालं होतं, खास काही जबाबदारी देखील नव्हती, दिसायला सावळा होता, पण तिची तशी खास काही अपेक्षा नव्हती, अट म्हणजे एकच होती की मला नोकरी करू द्यावी. आणि मुलाची देखील तीच अट होती, की नोकरी करणारी बायको हवी, त्यामुळे लग्न जुळण्यात काहीच अडचण नव्हती.
लग्न करून ती नव्या नावानी नव्या घरात आली, नव्या माणसात रुळायला जार वेळ लागला, पण ती देखील माणसच असतात, सवयी स्वभाव थोडा वेगळा असला, तरी त्यांनाही आपल्यासारखाच आनंद होतो, राग येतो, त्यांच्या आवडी निवडी जपल्या की ती ही पूर्वग्रह सारून जवळ येतात, मानसशास्त्रात शिकलेलं ती प्रत्यक्षात अनुभवत होती. सासू सासरे नणंद, जावा या सगळ्यात कधी जीव गुंततो सासुरवाशिणीला कळतच नाही. नवऱ्याचे गुणही हळूहळू समोर दिसायला लागतात. नवरा आधी एक पुरुष असतो, मग मुलगा,मग नवरा. हा क्रम कधी कुठे बदलतो, पण हिच्या घरी मात्र हाच होता.  त्याचे प्राधान्यक्रम कायमच वेगळेच असायचे. पण वडिलांचे तसंच रूप पाहिल्यान, जर तो तसा नसता तर तिला नवल वाटलं असतं.
त्याला कोणतीही गोष्ट जास्त काळ करायची सवयच नव्हती, त्यामुळे एकाच नोकरीत स्थिर स्थावर होणायची अपेक्षा त्याच्याकडून करणं म्हणजे फुटक्या घागरीन घर भरण्यासारखं होतं. पण तिला हे कळेस्तोवर त्याच्या २ नोकऱ्या ३ बिझनेस आणि २ पोरं जन्माला घालून झाली होती. आता तिला त्याचा अटीचं कारण कळत होतं, पण आता मागं फिरणं ही शक्य नव्हतं, संसार मोडणं हे पाप असतं, संसार ओढणं ही रीत असते, शिक्षणानी संस्कार थोडीच बदलतात. तसं बिडी काडीच व्यसन नव्हतं, पण नाद होता, सतत काहीतरी करून बघण्याचा, मग त्या नादात पैसे गेले तरी बेहत्तर.  धंदा शब्दाला एक निराळच वलय असतं त्यामुळे इंग्लिश बिझनेसच बर वाटतं कोणताही बिझनेस हा लोणच्या सारखा असतो, मुरत गेला की खरी चव कळते, एखादं लोणचं चालू असतं, पण ते जास्त दिवस टिकवायचा प्रयत्न केला तर खराब होतं, त्याला ही गोष्ट कळत नव्हती की समजून घायची नव्हती कोणास ठाऊक. लोणची, पापड, आंबे, फटाके, सौंदर्यप्रसाधने ते कपडे, खाद्य पदार्थ विकणाऱ्या कंपनीची, टपरवेअर, मातीची भांडी, साड्या, व्हिटामिनच्या गोळ्या, कसली कसली आयुर्वेदिक औषधं कशा कशाची म्हणून त्यांनी एजन्सी घेतली होती, दर वेळी तिनी शाळेत, घराच्या शिकवण्यांमध्ये त्याची जाहिरात करायची, मुद्दल परत हातात आली की याचा नवीन ‘धंदा’ सुरु. एकेकांना एकेक शौक असतो, तसा याला नव नवीन एजन्सी घेण्याचा शौक होता. घर तिच्या खर्चात चालतच होतं, त्यामुळे घरासाठी वेगळा काही पैसा द्यायचा असतो हे त्याच्या गावी देखील नव्हतं.
पोराचे प्रताप आई वडिलांना कळत होते, पण त्याला काही सुनावण्याची वेळ कधीच गेली होती, त्यामुळे ते निमुटपणे सुनेची पाठराखण करत होते. मुलं काळाबरोबर मोठी होतच असतात, तो कधी तरी शिकेल या आशेवर ती प्रत्येक वेळी त्याच्याबरोबर हिशोब मांडायला बसायची, आणि १० रुपयाचा देखील नफा झाला तरी तो पुढचं नवीन काही तरी करून बघायला तयार असायचा, ती त्याला बोलून थकायची नाही आणि तो तिला कानामागं टाकून. त्यांनी फार मोठी कर्जे केली नाहीत, पण छोटी छोटी कर्ज बरीच केली, प्रत्येक वेळी एकेक फटका म्हणून कधी दागिना, कधी FD मोडायची. सगळ्याला ती कंटाळून गेली होती, पण तरी रेटत होती. क्वचित कधी त्यानी तिला मोडलेला दागिना करून दिला, नाही म्हणायला, एकदा परदेशात फिरवूनही आणलं होतं. पण साधारणपणे त्याचं लाखाचे बारा हजार करणं सुरूच होतं.
जेव्हा त्यानी नवीन व्यवसायासाठी घर विकायची भाषा सुरु केली तेव्हा ती वाघिणीसारखी चिडून उठली, आजवर त्याला न ऐकवलेलं सारं ऐकवलं, आणि दर महिना मी तुला हातखर्चाला काही रककम देईन पण तू घरात बस, आजवर केलेस तेवढ पुष्कळ झालं. घराच्या आत ती पुरुष झाली होती. त्यानी थयथयाट केला, पण ती नाही बधली. बाई अशीच असते. सासऱ्यानी मरताना घर तिच्या नावावर केलं असल्यामुळं मी म्हणते तसं राहा नाहीतर घराबाहेर हो म्हणायला देखील तिनं कमी केलं नाही.

महिषासुरमर्दिनी, काली, चंडिका या सगळ्या असतातच आजूबाजूला, देवळातच नव्हे तर अशा कित्येक घरांमध्ये. वर्तमानपत्रात छापून येण्याएवढ, पुस्तक लिहिण्याइतक कर्तुत्व गाजवाण्याऱ्याच महान महिला असतात असं नाही, पण त्यांनीही त्यांच्या आयुष्यात खूप मोठी मजल मारलेली असते. आयुष्यातल्या काळ्या, गोऱ्या प्रसंगाला धीटपणे सामोऱ्या जाणाऱ्या अनेक अनामिकांसाठी आजचा करडा रंग. आयुष्य हे वाईटातून चांगलं शिकणं आणि चांगल्यातून नवीन काही शिकणं हेच तर असतं ना. जरासा औदासिन्याकडे झुकणारा, करडा रंग आयुष्यात कधी उदास करतो तर कधी आशा दाखवतो. आयुष्य काही एकाच रंगात रंगलेलं नसतं, त्यात चांगलं वाईट दोन्ही असतं, याचीच आठवण हा करडा रंग करून देतो. 

Sunday, September 25, 2016

आणि कपाट हसलं......

कपाट उघडल्याबरोबर कपडे खाली पडले की समजायचं कपाट लावण्याची वेळ आली आहे, मग काही दिवस चालढकल करून शेवटी तो दिवस उजाडतोच. आणि मग सगळ्या कपड्यांचा एका ढिगाऱ्यात आपण बसलेलो असतो. सारे आजू बाजूला पडलेले, कुर्ते, पंजाबी ड्रेसेस, जीन्स, लेगीन्स, स्कर्टस, नशिबानं साड्या वेगळ्या ठेवलेल्या असतात त्यामुळे त्या या सगळ्या गोंधळापासून दूर दुसऱ्या गोंधळात विसावलेल्या  असतात. जेव्हा आपण त्या कपड्यांच्या समुद्रात हरवलेले असतो, त्यावेळी अनेक नवीन नवीन शोध लागत असतात.

खरं तर कपडे ही माणसाची प्राथमिक गरज, पण आता कपडे, अन्नापेक्षाही स्वस्त झाल्यामुळे घरटी कपड्यांची दुकानं निघाली आहेत. पूर्वी कारणासाठी, सणावारी होणारी खरेदी आता सेल साठी, डिस्काऊंटसाठी होत असते. मग आपल्याला हवंय का पेक्षाही आत्ता मिळतंय, स्वस्त आहे, अगं ऑफर होती, परत परत काय अशी ऑफर नाही मिळणार , सणाला , वाढदिवसाला नवीन कपडे पाहिजेतच ना, एक कारणं, पण या कारणांची फळ निष्पत्ती म्हणजे कपाटात भर पडलेले नवीन कपडे. बर परत लग्न कार्य, भेटवस्तू म्हणून मिळालेलं कपड्यांचं वाण वेगळंच. आजकाल आहेर नसला तरी चालेल पण परतीचा आहेर झालाच पाहिजे, त्यामुळे अशा रिटर्न गिफ्ट मध्ये मिळालेले कपडे देखील बऱ्याच वेळा रीरिटर्न करायचेच असतात.

कपड्यांच्या त्या डोंगरातच अनेक दिवस सापडत नसलेलं कपडे सापडतात. आणि मग घडी घालता घालता आपण त्या कपड्यांच्या आठवणीत हरवून जात असतो. असं वाटत असतं जणू आपण आठवणींच्या प्रवासालाच निघालो आहोत. एक हिरव्या रंगाचा कुर्ता पहिल्या पगारातून दादानी आणलेला, आता थोडा विरलाय पण तरीही टाकवत नाही, अरे तो जांभळा बांधणीचा पंजाबी ड्रेस रूममेटच्या आईनी खास दिलेला, तिच्या आळशी मुलीला वर्षभर सांभाळले म्हणून, पांढऱ्या रंगाचा दोन तीन कुर्ते चुरगळलेले होते एका कोपऱ्यात, एकेका वेळेला आपल्याला वेड लागायचे एकेका रंगाचे, आणि मग आपण त्याच रंगाचे कपडे विकत घायायला सुरु करायचो,  सध्या जसं सध्या हिरव्या रंगाचं झालं आहे, त्याआधी निळा, त्याआधी किरमिजी, काळा असे किती तरी रंग आयुष्यात येऊन गेले होते. मग त्या रंगवेडाच्या वेळी घेतलेले एकाच रंगाचे पण वेगळ्या रंगछटांचे कुर्ते, मग त्याच कपड्यांच्या धबडग्यात तिनी त्यांची अजून काही बहिण भावंड शोधली, आणि सारी रंगावली एका बाजूला ठेवली. मग त्यातल्या प्रत्येकाच्या खरेदीच्या जन्माच्या आठवणींनी हसता हसता पुरेवाट झाली, एक कुठे अगदी फुटपाथवर घेतलेला, तर दुसरा फॅब इंडिया च्या वातानुकुलीत ठिकाणी घेतलेला, काही परदेशात घेतलेले तर काही घराजवळच्या छोटाशा दुकानात, पण बिचारे सगळे कपाटात शेजारी शेजारी सुखानं नांदत होते.

मग घड्या करत असताना एकदम घबाड लागल्यासारखं अगदी जुने कॉलेज मध्ये घालत असलेले काही कपडे मिळाले, आणि ती  तशीच उठून ते मापाला लावायला लागली, काही येत होते, काही वयाबरोबर अंगही सोडून गेले होते, मग न येणाऱ्या कपड्यांचा एक वेगळा कप्पा करायला सुरु केला.  एक भडक लाल रंगाचा आरसे लावलेला एक पंजाबी ड्रेस त्यानी अगदी प्रेमानी आणला होता, पण त्याच दिवशी त्यांचं काही तरी भांडण झालं होतं, त्यामुळे तो ड्रेस तिनी अंगाला देखील लावला नव्हता, आज तो ड्रेस हातात घेतल्यावर तिला त्यातली उब जाणवत होती. अशी अंगाची उब न लागलेलं कपड्डे तिनी पहिले वापरायचे ठरवलं. डोळ्यासमोर असणारे कपडे सारखेच वापरले जात होते, आणि मागे पडलेले कपडे, विस्मृतीत गेलेल्या लोकांसारखे मागेच पडत होते, त्या स्मृती परत जागवायच्या ठरवल्या. आयुष्य आणि कपडे असे हातात हात घालूनच जगतात, किमान माणसांच्या बाबतीत तरी.

एक जुना पिवळ्या रंगाचा ड्रेस पाहून तिला आठवलं, ह्या महागड्या ड्रेस वरून आईशी भांडण केलं होतं, कारण त्याच्या दोन दिवस आधीच एक ड्रेस घेतला होता, आणि आईचं म्हणणं होतं, असे सारखे सारखे पैसे कपड्यांवर काय उधळतेस, त्यावर माझे पैसे आहेत, मला करू देत ना हवे तसे खर्च म्हणत ती धुमसतच होती, आणि मग आईचा अबोला, मग माफीनामा, तिला खरंच वाटलं, तेव्हा तो ड्रेस खरच त्या मानाने महागच होता, आई म्हणाली, ते खरंही होतं, पण आई वडिलांचं म्हणणं पटायला कधी कधी वर्ष जाऊ द्यावी लागतात. मग एकदा अगदी शोधून शोधून घेतलेला चटणी रंगाचा चिकनचा ड्रेस, आणि मग त्याच प्रकारचे वेगवेगळे रंग गोळा करायचा जणू छंदच लागला होता, ते सारे लखनवी ड्रेस, कुर्ते एकत्र ठेवता ठेवता १० पेक्षा जास्त रंग आपल्या जवळ जमा झालेत, आणि आता पुढचे कोणते घेता येतील याचाच विचार मनात सुरु झाला होता.
आत्ता येणारे कपडे, आपले आवडते कपडे, घालता न येणारे पण तरीही आठवणी जपणारे कपडे, कडवट आठवणींचा माग ठेवणारे कपडे, जुने अंगाला न येणारे पण चांगले कपडे, खास प्रसंगांचे कपडे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने कपडे नीट घड्या घालून झाल्यावर, कामवालीला द्यायचे कपडे वेगळे वेगळे काढता काढता, तिनी त्यात एक दोन चांगले कपडे देखील घातले, कायम थोडेसे, उसवलेले, फाटलेले, विरलेले कपडे द्यायचे आणि दान केल्याचा आव आणण्यापेक्षा यावेळी चांगले, नवीन कपडे देऊन तिच्याही चेहऱ्यावर हसू फुलवूयात असं तिला वाटलं. आणि मग तिनी फाटलेले, विरलेले कपडे वेगळेच ठेवले, यावेळी ते कोणाला देण्याऐवजी त्याची दुसरी काही तरी सोय लावावी, आणि काही तरी वेगळ्या आठवणी तयार कराव्यात दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात असं तिला प्रकर्षानं जाणवलं.

जेव्हा कपाटात सारे घालत्या येण्याजोगे कपडे लावून झाले, आठवणींचे कपडे वेगळे काढून झाले, द्यायचे कपडे वेगळे ठेवून झाले, तरी सुद्धा कपाट भरून कपडे दिसत होते, अगदी लिंबू रंगाचा, फिरोझी रंगाचा, जो एके काळी तिचा जीव की प्राण होता त्या रंगाचा एकही कुर्ता, ड्रेस नसला तरी तिला तो खरेदी करावा असं त्या क्षणी तरी वाटत नव्हतं, स्वस्त आहे, घेऊ शकतंय म्हणून काही घेण्यापेक्षा आपण खरच आपल्याला गरज आहे का बघून घेतलं तर आपलेच प्रश्न किती सोपे होतील, किमान हे कपड्यांचे कपाट लावणं म्हणजे मोठ्ठा पेचप्रसंग सोडवणं वाटणार नाही असा स्वतःलाच बजावत तिनी मोठा निःश्वास सोडला.


कपडे शरीर रक्षण करतात, कपड्यांनीच चारित्र्य ठरतं, कपड्यांनीच रामायण , महाभारत घडतं, काळ बदलला तसे कपडेही बदलले, कपड्यांची लांबी रुंदी ,नक्षी, पोत बदलले, नवीन नवीन जे काही येऊ शकत होत ते सगळं कपड्यांच्या दुनियेत येतच असतं, आणि त्या सृष्टीचा पसाऱ्यातला एक छोटासा भाग असतो प्रत्येकाच्या कपाटात! कपडे येतात, जातात, वापरलेले कपडे, न वापरलेले कपडे, आवडते कपडे, नावडते कपडे, खास कपडे, कंटाळा आलेले कपडे, आठवणींचे कपडे, विरलेले कपडे जग कपड्यात लपेटून गेलेलं असतं तरी कपड्यांचं कपाट उघडल्या बरोबर आज काय घालावं? माझ्याकडे आज घालायला काहीच नाही ? हा प्रश्न मात्र आदिकाळापासून तसाच राहिलेला आहे!!!!!!!   

Thursday, September 22, 2016

आई गं ची जागा...


एका भारतीय पद्धतीचे पुरुषांचे कपडे बनवणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीत बाप आणि मुलगा दाखवले होते. स्वातंत्रदिनासाठी मुलाला झब्बा घालायचा होता, आई कुठेतरी दुसरीकडे गेली होती, अशी काहीशी जाहिरात होती ती. मुळात पुरुषांसाठीच्या कपड्यांच्या जाहिराती मध्ये बाईचे नसणं हाच एक सुखद धक्का होता, त्यात वडील मुलाची काळजी घेत आहेत हे पाहणं म्हणजे सोनेपे सुहागा होतं. जाहिराती ह्या समाजमनाचा आरसा समजल्या जातात. त्यामुळे आईच्या अनुपस्थितीत मुलाला सांभाळणारे, त्याला तयार करून देणारे बाबा आजूबाजूला वाढले असणार अशी एक खात्री झाली.

मुलांचे संगोपन ही जणू निसर्गानेच मादी जमातीवर सोपवलेली जबाबदारी आहे असं फक्त मनुष्य प्राण्यातच नव्हे इतर प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये देखील समजलं जातं.  अर्थात नियमाला अपवाद असतात तसेच पेंग्विन, rhea प्रकारचे शहामृग, समुद्री घोडे, काही प्रकारचे मासे, बेडूक, असे काही बाबा लोक आहेत जे मुलांचे संगोपन करतात, यातले काही जण तर चक्क पिल्लांची अंडी त्यांच्या, पोटात, तोंडात, अंगावर ठेवतात. हे सारे जणू अपवादाने नियम सिद्ध होतो अशा पंथातले. पण मनुष्य प्राण्यांमध्ये हे चित्र थोडे थोडं बदलताना दिसतंय. म्हणून तर सरकारी नोकरीतल्या कर्मचाऱ्यांना १५ दिवसाची पितृत्व रजा मिळते जी बाळहोण्याआधी पासून ते  झाल्यापासून सहा महिन्यापर्यंत कधीही घेता येते. सरकरी तजवीज झाली, पण या सोयीचा उपयोग किती बाबांनी खरोखरीच मुलांच्या गरजेसाठी करून घेतला हा ही एक संशोधनाचा विषय आहे.

पुरुषाने घराबाहेर ची कामं करायची, आणि बाईनी घराच्या चार भिंतींच्या आतली, हा समज आता बर्यापैकी मोडीत निघतोय, त्यामुळे चित्रपटातही घरबशा  नवरा, आणि नोकरी करणारी बायको असं बघायला मिळतंय. तसंच शहरांमध्ये कित्येक हॉस्पिटलमध्ये आता आईच्या शेजारी उभं राहून बाळांना नॅपी घालणारे, त्यांचे कपडे बदलणारे बाबा दिसायला लागलेत. हे चित्र अगदी प्रातिनिधीक नसलं तरी मनोवृत्तीतला बदल टिपणार नक्की आहे. मुलांसोबत डॉक्टर कडे जाणारे बाबा देखील आता नवीन राहिले नाहीत. पाश्चात्य देशांमधल्या काही चांगल्या गोष्टी आपल्याकडे रुजतात आहेत. आई वडील दोघांनी अगदी समसमान जबाबदारी नाही पण जबाबदारी वाटून घेतली जात आहे.

अगदी तान्हं मुल असो वा शाळा, कॉलेज मध्ये जाणारी मुलं त्यांच्या परीक्षा, आजारपण यावेळी आईची हमखास सुट्टी पडते, किंबहुना ती आईनीच घेतली पाहिजे असा मानसिक, सामाजिक दबाव स्त्रियांवर असतो. चुकून एखाद्या पुरुषाने अशी रजा घेतली तर त्याच्या बायकोला मुलांकडे दुर्लक्ष करते असं ऐकावं लागतं. खरं पाहिलं तर मुलांचे संगोपन ही आई वडील दोघांची जबाबदारी असते, त्यामुळे मुलांच्या प्रत्येक गरजेच्या वेळी आईनीच घरी थांबलं पाहिजे असं नसतं. खास करून नोकरी करणाऱ्या आयांमध्ये तर हा खूप मोठा गंड असतो, जणू आपण नोकरी करतो त्यामुळेच मुलं आजारी पडतात, किंवा त्यांच्या शाळा, त्यांच्या शाळाबाह्य गोष्टी जपणं, जोपासणं ही जणू फक्त आईचीच जबाबदारी असते. नोकरी न करणाऱ्या ऐअला तर बिचारीला कोणतीच सबब नसते. घरातल्या बाकीच्या साऱ्यांचे करायचे, आजारी मुलाबरोबरच, दुसरं मूल असेल तर त्याला बघायचं, अशा वेळी खरंच जोडीदाराकडून मदतीची अपेक्षा असते. कधी कधी अशा वेळी मनात विचार देखील येतो, मुलाच्या जन्माचे कारण झालं की पुरुष मोकळेच असतात. मुलाला नाव वडिलांचं लागतं, नावं ठेवताना मात्र आईचे नाव पुढे येते.

परदेशात पितृत्वाची राजा ही हक्काची मानली जाते, कारण तिथं आपल्यासारखी बळकट कुटुंबव्यवस्था किंवा समाजसंस्था नाही. त्यामुळे ओघानं वडिलांवर देखील बाळाची जबाबदारी येते. स्वीडन मधेय ही पितृत्व राजा सुरु केल्यापासून घटस्फोटाच प्रमाण कमी झालं, यावरून तिथल्या समाजरचनेचा अंदाज येऊ शकतो. आपल्या देशात स्त्रियांसाठी १२ आठवड्याची मातृत्व रजा असते, मात्र सरकारी कर्मचारी वगळता खाजगी कंपन्यांमध्ये पितृत्व रजेची तरतूद फारशी आढळत नाही, आणि याचं एक कारण म्हणजे आपली मानसिकता! पुरुषांनी घराची कामं, स्वैपाक (हॉटेल मध्ये पुरुष आचारी चालतो मात्र घरात नाही ), मुलांचे संगोपन करणं या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक बघितलं जात नाही, आणि कित्येक पुरुषांनाही ह्या सगळ्या गोष्टी करताना कमीपणा वाटतो. जेव्हा आपण कारण ठरलेल्या जीवाची जबाबदारी घेणं म्हणजे फक्त त्याच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करणं इतकाच नसतं हे समाजात मान्य होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आई बाबा दोघंही मुलांच्या जडण घडणीला हातभार लावतील. पुरुषांना या गोष्टी जमणारच नाहीत, त्यांना आवडत नाहीत, ही त्यांची कामं नाहीत हे असे सगळे समाज पुसले जातील तेव्हा कदाचित मातृत्व रजा सारखी पितृत्व रजेची गरज भासेल, कोणी सांगाव त्यासाठी एखादं आंदोलनही भविष्यात उभं राहू शकतं.   

एखादा नवीन बाबा हौसेनं मुलाचं काही करायला घेतो तेव्हा त्याच्यावर पहिली प्रतिक्रिया येते ती त्याच्या आईकडून, कधी त्यात कौतुक असतं, तर कधी असूया! आताच्या पेरेंटिंगच्या क्लास ला जाणाऱ्या, जग निम्मं फिरलेल्या, किंवा बघितलेल्या बाबा लोकांना देखील मुलाची दुपटी बदलावीशी वाटतात, आपल्यामुळे या जगात आलेल्या जीवाला अंगा खांद्यावर खेळवता खेळवता खायला प्यायला घालावंसं वाटतं. आणि जेव्हा खरंच असं घडतं तेव्हा नकळत स्पर्शातून बाळापर्यंत ते प्रेम पोहोचत असतं. आणि असं जेव्हा सगळीकडे व्हायला लागेल, प्रत्येक बाबा रजा मिळू, ना मिळू, पण वेळ काढून मुलांना वेळ देईल तेव्हा काहीही लागलं, दुखलं खुपलं तर सहज तोंडातून बाहेर पडणारं ‘आई ग’ ची जागा ‘ए/ओ बाबा’ घ्यायला वेळ लागणार नाही.

Monday, September 19, 2016

ओळखीचं अनोळखीपण

ते गाव सोडूनच आता कित्येक वर्ष झाली होती, आयुष्यातली सर्वात सुंदर १०, १२ वर्ष त्या गावात घातली होती. स्वतःचे घर ही केलं होतं, अगदी छानसा छोटासा बंगला, मग काय आमची शिक्षणं, नोकरी, लग्न यानंतर त्या गावातलं वास्तव्य कमी कमी होत गेलं, मग कधीतरी ते घरच विकायचा निर्णय घेतला. तसा तो निर्णय कोणालाच फारसा पटला नव्हता, पण दुसरा उपायही नव्हता. तिनी आणि तिच्या बहिणींनी एक जग तयार केलं होतं त्या गावात, घरात. बांच्या फिरत्या नोकरीमुळे कुठे एका गावात राहता येईल असं वाटलंच नव्हतं. पण या गावात ते काही काळासाठी का होईना पण स्थिरावले. बदली झाली पण जवळपासच्याच गावांमध्येच झाली. प्रवासाची दगदग सोसली, पण गाव बदलावसा नाही वाटलं. एक प्रकारचा आराम, निवांत आपलेकपणा होता गावात. म्हणलं तर शहर म्हणलं तर गाव असं काहीसं आडनिड होतं ते. तसंच काहीसं लोकांबाबत सगळेच चांगले होते असे नाही, पण उडदामाजी काळे गोरे सारखे चालवून गेले, कोनाताय्ही नातेवाईकाशिवाय १०, १२ वर्ष सगळं निभावून गेलं. काही जवळचे ऋणानुबंध जुळले, काही नवीन अनुभव आले, बरंच काही शिकायला मिळालं, त्यामुळं गाव सोडताना कोणीच खुश नव्हतं.

१२ वी नंतर ताई लांब दुसऱ्या कॉलेजात गेली, मग वर्षभरात तिची १० वी झाल्यावर सगळाच गाशा गुंडाळून सगळेच दुसऱ्या गावाला गेले होते. आज इतक्या वर्षांनी देखील तिला त्या गावाबद्दल तेवढेच प्रेम होतं. त्याच गावात ती पहिल्यांदा सायकल सायकल होती, त्याच गावात पहिल्यांदा न्हाण आलं होतं, त्याच गावात स्वैपाक करायला शिकली होती, घट्ट मैत्रिणी जमवायला सुरुवात तिथेच झाली होती, आई बाबांशी वाद घालायला त्याच गावातून सुरु केलं होतं, शिकणं फक्त पुस्तकात नसतं तिथेच कळल होतं, अठरापगड जाती, त्यांचे सामाजिक जीवन प्रत्यक्ष बघायला मिळत होतं. शिक्षक हे शाळेच्या वेळेपुरते मर्यादित नसतात हे प्रत्यक्ष अनुभव होती. घरात केलेलं काहीही हे फक्त घरापुरत नसतं, ते शेजार पाजारच्या ओळखीच्या पाळखीच्या साऱ्यांमध्ये वाटायचं असतं. घरात काही नसलं तर खालच्या मानेनं नव्हे तर हक्कानं शेजारी मागायचं असतं, एक ना अनेक किती गोष्टी ती अनुभव होती, शिकत होती. त्यामुळे एकदम गाव बदललं तरी गावात शिकलेल्या गोष्टी विसरल्या गेल्या नव्हत्या, गावातून थेट आजी आजोबांच्या घरी जाण्याचा एक वेगळा आनंद होता. बाबा तर म्हणाले पण सगळं फिरून शेवटी इथंच आलो. बालपण गेलं त्या घरात परत राहायला जायचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळे तर तिला तिचं बालपण गेलेल्या घराची अजूनच आठवण यायची. लहानपणी कधी तरी ती म्हणायची, आपण नं उडतं घर बनवलं पाहिजे म्हणजे आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे हे घर पण नेता नेईल.

प्रत्येक गावाची एक संस्कृती असते, तुमच्याही कळत नकळत तुम्ही त्याचा भाग बनत असता, तुम्ही ते गाव सोडा, नका सोडू पण ती संस्कृती कुठे तरी आत मध्ये टिकून असते. त्या गावाचं नाव काढलं तरी पुढचे कित्येक वर्ष तिच्या डोळ्यातून पाणी टिपकायच. त्या गावातला अल्लडपणा, बालीशपणा जणू तिनी त्या गावच्या वेशीतच ठेवला होता. गाव सोडलं आणि ती ही बदलली होती. लग्नानंतर तर देशच बदलला, त्यामुळे आसव गाळायला अजून कारण मिळाली होती, कधी तरी त्या गावात, देशात रुळून गेली, आपल्या माणसांची आठवण काढणं सवयीचं झालं, वर्षाकाठी एक मायदेशी ट्रीप काढून काही आठवड्यात कौटुंबिक, मैत्रीक नाती जोपासून परत जाताना पुढचे काही दिवस सगळ्यांनाच अवघड जायचे. परदेशातही काही गावं बदलून झाली, घरं तर इतकी बदलली की नंतर घरामध्ये जीव अडकवायचीच भीती वाटायची, असं वाटायचं, आपण घर सोडताना आपल्या आयुष्याचा एक भागच जणू तिथं सोडून जातोय असं वाटायचं. आपण म्हणजे आपण आज असतो तेवढेच नसतो ना, जिथं राहतो, ज्या लोकांबरोबर राहतो, वाढतो, चुकतो, शिकतो, ते सगळं असतं ना. एका दिवसाची गोष्ट नसते ही काही, त्यामुळेच जुन्या दिवसांची किंमत जास्त असते, प्रत्येक गावात घरात आपण आपल्या आयुष्याच्या काही सावल्या सोडलेल्या असतात. मग या गावाला, घराला विसरून कसं चालेल, तिथं विसरलेल्या सावल्यांना भेटलंच पाहिजे ना.  तिला परत त्या आयुष्यात जावसं वाटलं. 

मग एका भारतातल्या भेटीत तिनी मनाचा हिय्या केला आणि गावाला जाऊन घर बघायचं ठरवलं. खरतर असं कित्येक दिवसांत एकटीनं प्रवास केलेलाच तिला आठवत नव्हता. सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता तिनं एकटीनच जायचं ठरवलं होतं. खरंतर ते गाव माहेरच्या गावापासून जेमतेम ४ तासाच्या अंतरावर पण तरीही ते ४ तासांचे अंतर  कापायला तिला जवळ जवळ २० वर्ष लागली होती. आपण आपलं घर बघून येऊया ह्या विचारानं मनाचा ताबा घेतल्यापासून ती जणू झपाटूनच गेली होती, तिला या भारताच्या भेटीत ही बालपणाची भेट घ्यायचीच होती.
अगदी ठरवून तिनी कार नाकारली होती, जणू तिला तो सगळा काळ परत अनुभवायचा होता म्हणून तिला राज्य परिवहन मंडळाच्या गाडीतूनच जायचं होतं. लहानपण अनुभवायचा एक मार्ग असतो, तेव्हा जे जे केलं ते ते परत कोणाच्याही भितीशिवाय करणं. ती जेव्हा त्या बस मध्ये बसली तेव्हा तिला ती पिचकाऱ्यांनी रंगलेली, सीटमधला स्पंज बाहेर येणारी, खिडक्या अर्धवट उघडणारी गच्च भरलेली बस सुद्धा आरामदायक वाटायला लागली, तेव्हा तिला खरंच मधली वर्ष गळून पडल्यासारखी वाटली. अगदी सहजतेनं ती शेजारच्या आजीशी गप्पा मारायला लागली, थोडं सरकून घ्या म्हणत तिघांच्या जागेवर त्या तीन बायका आणि एक मुलगा असे साडे तीन जण आरामात सुखानी बसले होते. बाहेरचं काही खायचा मोह तिनी टाळला पण घरून आणलेलं डब्यातलं खाताना तिला पिक्चर ला सुद्धा डबा बांधून देणाऱ्या मैत्रिणीच्या आईची आठवण आली. सारंच काही बदललं होतं, रस्ते, रस्त्यावरची गावं, लोकं ही थोड्याफार प्रमाणात बदलले होतेच. ४० रुपयाच तिकीट १३० रुपये झालं होतं, पण तेव्हा जशी लोकं किती महाग आहे म्हणायचे तसंच आजही म्हणत होते. मोबाईलमुळे जगभर संवाद होत होता पण शेजारच्या माणसाकडे बघायला वेळ नव्हता. तिचीच माणसं ती जणू पुन्हा नव्यानं पाहत होती.

गावात उतरल्यावर कोणतीही ओळखीची खुण सापडेना तेव्हा तिला क्षणभर आपण एकटीनं येऊन चूक केली की काय वाटायला लागलं. पण वेड अंगावर स्वार असलं तर शरीर मन क्षमतेपेक्षा जास्त कामं पार पाडून दाखवतात. बस स्थानकापासून थोडं लांबच होतं त्याचं घर, गुगल वर तसा तिनी रस्ता सारं पाहून ठेवलं होतं. त्यावेळी गावाबाहेर असणारं त्याचं घर आता गावाच्या हद्दीत काय मध्यवर्ती वस्तीत आलं होतं. रिक्षानीच जावं म्हणत तिनी चेहेऱ्यावरचा गोंधळलेला भाव जरा पुसला, आणि चक्क एका रिक्षावाल्याशी भाव करत मी काही नवीन नाही हे दाखवून दिलं, तिच्याच वयाचा होता अतो रिक्षावाला, कोण जाणे कदाचित आपलाच एखादा वर्गमित्र असायचा, उगाच तिला योगायोगांचे योग यावेत वाटायला लागलं, इमारती उंच होत होत्या, मोठी मोठी दुकान येत होती, आणि जुनं गाव हरवत होतं. रस्त्यावरच्या एक दोन खुणा सोडल्या तर सारंच काही वेगळ होतं. तिला रिक्षावाल्याशी स्नावाद साधायचा मोह होत होता, कधी काही काही मोहांना शरण जाणं चांगल असतं, त्यामुळ तिलाही कळलं नाही कधी तिनी गप्पा मारायला सुरुवात केली. पूर्वी शहर म्हणाल्यावर एक अन्तर जाणवायचं, आणि गाव म्हणाल्यावर एक आपुलकी, आता प्रत्येक गावाला शहर बनायची घाई झालेली असल्यामुळं प्रत्येक जण जगायचं सोडून पळायचं शिकलाय. जेव्हा ती पत्त्यापाशी आली तेव्हा आळीतली दोन चार घर सोडली तर साऱ्या इमारतीच दिसत होत्या. त्या रिक्षावाल्याला तिथेच ५ मिनिटं थांबायला सांगून ती त्यांच्या घरापाशी गेली. साधं चार खोल्यांचं, आजूबाजूला बाग असलेलं घर त्याचं आता चांगल दुमजली झालं होतं, काळाबरोबर झाडही हरवली होती, इंच न इंच सिमेंट चं साम्राज्य दिसत होतं. एकदा आत जाऊन बघावं का? परत एकदा झालेल्या मोहावर विजय मिळवणं अशक्य आहे कळल्यावर तिनी बेधडकपणे दारात जाऊन आल्याची वर्दी दिली. खिडकीतून डोकावणाऱ्या आवाजाला सांगितलं, जरा दोन मिनिटं दरवाजा उघडता का, पूर्वी आम्ही इथं राहायचो, म्हणून खास घर बघायला आले मी. थांबा जरा, मग तो खिडकीतला आवाज आत जाऊन कोणाला काही तरी विचारून आला, दरवाजा जरा किलकिला झाला, परत एक प्रश्नतपासणी झाली, आणि मगच ती आत गेली, त्यांनी ज्यांना घर विकलं होतं, त्या लोकांकडून या लोकांनी १० वर्षापूर्वी घर विकत घेतलं होतं, त्यामुळे त्यांना ही जरा आगाव आगंतुकच वाटत होती. आपलच घर दुसऱ्या लोकांनी सजवल्यावर किती अपरिचित भासतं. पूर्वी फक्त रात्री बंद होणारी दारं आणि आताच्या दिवस रात्र बंद असणाऱ्या खिडक्या तिला आयुष्याचं प्रतिक वाटत होत्या. त्या अनोळखी माणसांच्यामध्ये सुद्धा तिला तिचं बालपण, तिच्या आठवणी साऱ्या दिसत होत्या, स्वतःलाच ती पुन्हा नव्यानं भेटत होती. निघताना तिचे डोळे परत भरून आले होते. ती रिक्षात बसता बसता, त्या घरात राहणारी मुलगी आली आणि शांत घर परत गजबजून गेलं होत जसं ती असताना व्हायचं तसंच.

परतीच्या प्रवासात डोळे बंद करून ती आठवत होती, विसरलेल्या आठवणी, शाळेचा गृहपाठ, फुलांच्या वेण्या, टिपऱ्या, लगोरीचा खेळ, शेजारच्या काकूंची घरून येणारी अळू वडी, आळीतला भोंडला, गणपतीमध्ये पहिल्यांदा केलेलं नाटकात काम, शेजारच्या ताईचा तिच्या मित्राला हळूच पोहोचवलेला निरोप, दिवाळीला केलेला मोठा किल्ला, नरकचतुर्दशीला पहिल्यांदा फटके फोडायची स्पर्धा, मागच्या घरातल्या काकांनी अंगचटीला यायचा केलेला प्रयत्न, त्यानंतर त्या घरी कधी गेलीच नाही ती. सायकल शिकताना फुटलेले गुडघे, दोन वेण्यांमध्ये दोन गजरे माळायचा वेड्चापपणा, चोरून आई काकूंच्या गप्पा ऐकून त्याचं केलेलं गॉसिप, भारत पाकिस्तान च्या सामन्याच्या वेळी केलेला कल्ला. आपणच जगलेलं आयुष्य ती परत एकदा जागून घेत होती, स्वतःच स्वतःला भेटत होती, गावामधली ती आणि आता जग फिरलेली ती या प्रवासातून आयुष्याचा एक सांधा जोडू पाहत होत्या. निसटलेलं निरागसपण मिळवू पाहत होती. विसरलेल्या सावल्यांना परत भेटत ती चालत होती.  इतके दिवस आरशात बघताना जाणवणारं एक अनोळखीपण पुसू पाहत होती!!!